जाहिराती आणि वाचक
वर्तमानपत्रात, साप्ताहिकात आणि दिवाळी अंकात वाढत चाललेल्या जाहिराती हा वाचकांना त्रासदायक वाटू शकणारा विषय आहे. गेल्या काही वर्षात तर वर्तमानपत्राचे पहिले पानही जाहिरातीसाठी राखीव ठेवले जाते. म्हणजे पहिल्या पानावरची ठळक बातमी ही मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
वर्तमानपत्रांचे अर्थकारण संपूर्णपणे जाहिरातींवर अवलंबून असते हे महत्वाचे सत्य अनेक वाचकांना माहिती नाही. आपण देत असलेली किमत ही कागद आणि रंगीत छपाई यांचा खर्च भरून काढण्या इतकी सुद्धा नसते.ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर वर्तमानपत्रांचा ग्राहक हा वाचक नसून जाहिरातदार असतो हे लक्षात घायला हवे.
म्हणूनच एके काळी स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारिता कमी होत जाताना दिसते. याचे सोपे साधे कारण आहे. जे वाचकांना आवडते ते छापण्या ऐवजी, जो जाहिरातदाराचा अपेक्षित ग्राहकवर्ग आहे त्या ग्राहक-वाचकांना काय आवडते तसा मजकूर देण्याचा अलिखित संकेत पाळला जातो.
अनेक सामजिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती वाचायला मिळतच नाही. फोटोसकट बातमी हा बोनस असतो. त्यातही खोलवर जावून विचार केला तर कार्यक्रमाला सेलेब्रिटी कोण आहे याचा जास्त विचार होतो.
कोणत्याही कार्यक्रमाची कार्यक्रम पूर्व प्रसिद्धी आणि नंतर बातमी हवी असेल तर त्या बदल्यात मोठी जाहिरात दिली गेलेली असते. त्याच बरोबर ज्या कार्यक्रमांना वर्षानुवर्षाची सामाजिक किंवा रसिक मान्यता असते त्या बातम्या या जाहिरातदारांच्या ग्राहकांच्या पसंतीच्या असतात म्हणून त्यांना विस्तारपूर्वक प्रसिद्धी द्यावी लागते. उदाहरणार्थ ,सवाई गंधर्व संगीत महोत्सव! केवळ पुण्यातूनच नव्हे तर समाजातील उच्चवर्गीय आणि एलिट वाचक गट त्या कार्यक्रमाला उपस्थित असतो. म्हणूनच अशा कार्यक्रमांना विस्तृत प्रसिद्धी मिळते.
म्हणूच एक लक्षात घेणे आवश्यक आहे की आपली बातमी ही दर चौरस सेंटीमीटर जागेची जी किंमत असते.त्यापेक्षा अधिक महत्वाचा आणि मुद्दा म्हणजे त्या बातमीतून निर्माण होणारी जाहिरातींची शक्यता!
सर्व दिवाळी अंकांचा अनुभव कमी अधिक प्रमाणात असाच असतो. अनेक दिवाळी अंकात पानोपानी जाहिराती असतात. त्या मिळवणे कर्मकठीण काम असते. आत्ता पर्यंत अनेक जाहिरात प्रतिनीधी -आमच्या अंकाचा खप, लोकप्रियता , शेल्फ लाईफ अशा गोष्टी जाहिरातदारांना पटवण्यासाठी सांगत असत. त्याच बरोबर अंकाला मिळालेली पारितोषिके अंक प्रसिद्धीची वर्षे (प्रसिद्धी जेष्ठता) यांच्यावर भर देत असत. परंतु आता तुमच्या ग्राहकवर्गाला निश्चित भावेल असे साहित्य दिले जात आहे हे ठामपणे पटवून दिले तर जाहिरात देण्याची शक्यता वाढवली जाईल असे मला वाटते.
माझी फक्त एकच आशा आहे की वर्तमान पत्रांच्या तुलनेत दिवाळी अंकांना कमी स्पर्धा असते. त्यामुळे वाचकांना जो आवडेल त्या ग्राहकांना मजकुरासाठी पैसे मोजल्याचे समाधान द्या!